|| सद्गुरु दाविद महाराज प्रसन्न ||

वधस्तम्भि जाण्यापूर्वी प्रभू येशु ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसमवेत भोजन केले. प्रभू येशूने स्वतः आपल्या शिष्यांचे पाय पाण्याने धुउन पुसले. त्यानंतर त्याने शिष्यांना उपदेश केला कि तुम्ही मला गुरु व प्रभू म्हणून संबोधिता, तरीही मी तुमचे पाय धुतले. कारण जे मी तुमच्या बरोबर वागलो तेच तुम्ही सर्व शिष्यांनी एकमेकांबरोबर वागावे. म्हणजेच प्रभू येशूने सर्व शिष्यांना नम्रतेचा, लिनतेचा आणि एकोप्याचा धडा आपल्या वागण्यातून दिला.

दिनांक १० जून २०१५ रोजी श्री दाविद महाराजांच्या द्वितीय पुण्यतिथीच्या निमित्ताने वरील गोष्टीचा प्रत्यय आला. श्री महाराजांचे शिष्य सर्व दूरवरून एकत्र आले आणि एकोप्याने, गुण्यागोविंदाने, प्रेमाने त्यांचा पुण्यतिथी सोहळा प्रचंड उत्साहात साजरा केला. दिनांक ९ जून मंगळवार पासूनच समाधी स्थळावर एकाच लगबग उडाली होती. महाराज जिथे बसत ते श्री शाह साहेबांचे दुकान तसेच समाधी स्थळ झाडून पुसून लक्ख केले गेले. फुलांची आरास केली गेली.

दुपारी ४ पासून ह. भ. प. श्री म्हसकर महाराजांनी श्री गुरुचरित कथात्मक प्रवचन आपल्या रसाळ पूर्ण वाणीने सादर केले. त्यानंतर सायंकाळी ६.३० ते ८.०० पर्यंत हरिपाठ मंडळ, माधवनगर, यांनी हरिपाठ सादर केला. रात्री जवळपास ६०-७० लोकांच्या भोजन, प्रसादाची सोय श्री बेलवलकर यांनी केली. रात्री भोजनानंतर सांगलीतील हनुमान समाधी भजन मंडळाने श्री केळकर महाराजांच्या उपस्थितीत भजन करून रात्री १२ वाजेपर्यंत भजनाची धमाल उडवून दिली.

दुसर्या दिवशी ज्येष्ठ कृष्ण नवमी बुधवार दिनांक १०.०६.२०१५ रोजी सकाळी ६.३० ते ७.३० पर्यंत प.पु. चैतन्य भारती महाराज, मठाधिपती नरंदे यांच्या हस्ते श्रींच्या समाधीवर पवित्र जलाने अभिषेक व पुष्पवृष्टी चा कार्यक्रम झाला. अभिषेकासाठी श्री टेके व श्री माने यांनी रत्नागिरी समुद्र, काजळी नदी, श्री महाराजांच्या शेतातील पवित्र झरा, गरम पाण्याचा झरा, कृष्णा नदी अशा पाच ठिकाणचे पवित्र जल आणले होते. त्यानंतर बर्याच भाविकांनी स्वरचित आणि प्रचलित भजने म्हणून कार्यक्रमाला शोभा आणली.

सकाळी १० वाजता श्री महाराजांची पालखी शंख, तुतारी, ढोल ताश्यांच्या गजरात समाधी वरून निघाली. संपूर्ण पालखी सोहळ्यात भजने आणि नामाघोषाची धूम उडाली होती. संपूर्ण माधवनगरात ठिकठीकाणी सुवासिनींनी ओवाळून पालखीचे स्वागत केले. फक्त महाराजांचे जिथे वास्तव्य होते तिथे म्हणजे श्री शाहसाहेबांच्या दुकानासमोर पालखी खाली ठेउन महाआरती केली. सर्वाना प्रसाद म्हणून चहाचे वाटप झाले आणि पालखी परतीच्या प्रवासाला लागली.

साधारण १२.३० च्या सुमारास पालखी समाधी मंदिरात परत आली. सर्व भगिनींनी फुगड्या घालून स्वागत केले. तसेच कोल्हापूर वरून आलेले श्री चीलये महाराजांचे भक्तांनी "चला हो मंदिरी", "स्वप्नात आले दाविद बाबा" अशी एकापेक्षा एक रसाळ भजने म्हणून कार्यक्रमात खूप रंगत आणली.

तद्नंतर प.पु. ह.भ.प. श्री झेंडे महाराज, ह.भ.प. कोटणीस महाराज, प.पु. ह.भ.प. श्री केळकर ( आण्णा) महाराज, प.पु. आपटे बाबा आणि इतर सर्व भक्तांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली. दुपारी एकच्या सुमारास उपस्थित महानुभाव श्री केळकर महाराज, श्री भारती महाराज, श्री आपटे बाबा व इतर निवडक भक्तांच्या हस्ते श्री महाराजांच्या पाकीट डायरीचे उद्घाटन झाले. जवळपास १००० भक्तांनी महाप्रसाद आणि पाकीट डायरीचा प्रसाद घेतला.

वरील सर्व कार्यक्रमात श्री पप्पू डोंगरे, मा.खा. श्री संजय काका पाटील यांची मोलाची उपस्थिती व मार्गदर्शन होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व श्री नेताजीराव साळुंखे, शाह साहेब, टेके साहेब, प्रकाश किर्वे, गवळी टेलर, पठान, उदय पाटील, कुमठे गावाचे भक्त, मधु ( ड्रायवर) ई. सर्व भक्तांनी हिरहिरीने भाग घेऊन आपली सेवा दिली.

संपूर्ण सोहळ्यात श्री दाविद महाराज जणू स्वतः जातीने उपस्थित राहून भक्तांना मार्गदर्शन करीत होते, असा भास होत होता. सायंकाळी समाधी मंदिरातून परत जाताना सर्व भक्त मंडळी एका बाजूला समाधानी, तृप्त होती आणि दुसर्या बाजूला हे सर्व सोडून जाताना काहीशी उदास होती. जणू एखादी सवाशीण माहेर सोडून सासरी जायला निघावी, त्याच भावनेने, जड अन्तः करणाने भक्त मंडळी परतीच्या प्रवासाला निघाली.....परत पुन्हा येण्याच्या निश्चयानेच.....

|| ॐ दाविद… हरी दाविद… ॐ दाविद… गुरू दाविद ||

टीप: वरील लेखातील येशु ख्रिस्ताची कथा संध्यानंद या पेपरात ०५/०४/२००७ साली आली होती. ती महाराज पुन्हा पुन्हा वाचत होते तेव्हा तिथे उपस्थित भक्त श्री बेलवलकर यांनी महाराजांना विचारले असता महाराज म्हणाले कि या गोष्टीत खूप मोठा उपदेश आहे.