Lastet News
-
सहावी पुण्यतिथी
सहावी पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम सोहळा Click here -
पाचवी पुण्यतिथी
पाचवी पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम सोहळा संपन्न. Click here
- नववी पुण्यतिथी २२ जून २०२२
- सहावी पुण्यतिथी २६ जुलै २०१९
-
मूर्तीची प्राणप्रतिष्ठापन सोहळा
बुधवार दि. २९-८-२०१८ ते ३१-८-२०१८
- पाचवी पुण्यतिथी 07 जुलै 2018
- चतुर्थ पुण्यतिथी 18 जून 2017
- तृतीय पुण्यतिथी २८ जून २०१६
- लक्ष्मी पूजन ११ नोवेंबर २०१५
- द्वितीय पुण्यतिथी १० जून २०१५
- Christmas २०१४
- प्रथम पुण्यतिथी २१ जून २०१४
- चैत्र पोर्णिमा ४ एप्रिल २०१५
||श्री दाविद महाराज कि जय ||
परमपूज्य श्री. दाविद महाराज म्हणजे साक्षात वेदान्ताचे सार.
पूर्ण मुक्तात्मा, प्रत्यक्ष परब्रहमाशी एकरूप झालेली, कैवल्यपद प्राप्त झालेली 'माऊली'. होय माऊली ही शब्द योजना जाणीवपूर्वक केली आहे.कारण दाविद माऊली कडे दर्शनाला, प्रार्थनेला यायला कुणालाही आडकाठी नसे. आपली तक्रार, अडचणी,गाऱ्हाणी आपण आईकडेच जास्त मोकळेपणाने मांडू शकतो, तद्वतच दाविद महाराजांकडे सर्व, राजकीय, सामाजीक, आर्थिक , मानसीक थरातील लोक येत असत.सर्वांना तिथे समानच वागणूक मिळे.
कुणीही दर्शनाला किंवा प्रार्थनेला श्री . महाराजांकडे गेले कि त्यांच्याकडे पेन कागद मागुन त्यावर श्री. महाराज लिहीत "दाविद from शास्त्र", शास्त्र म्हणजे प्रत्यक्ष वेदांचे सार तिथून या भूतलावर आपल्या सारख्या मुढ जनांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मातेची करुणा मनात व डोळ्यात घेऊन यालोकात आलेली विभूती म्हणजेच श्री दाविद महाराज.
प. पू . दाविद महाराजांचा जन्म १ जानेवारी १९३३ रोजी पाली या रत्नागिरी जवळील एका छोटयाशा खेड्यात झाला. वडील शांतवन आणि माता बेला वाघचौरे या ख्रिस्ती दांपत्याच्या पोटी श्री. दाविद महाराज हे अपत्य . एकंदरीत परीवार ऎसपैस. वडील ब्रिटीश कालीन मॅजिस्ट्रेट. त्यामुळे वरचेवर बदल्या. अमरावती, नगर , अलिबाग इत्यादी जागांचे उल्लेख महाराजांचे तोंडी येत असत. लहानपणापासुन महाराज चुणचुणीत आणि कुशाग्र बुद्धीचे असल्याने त्यांच्या मोठया भावाने वसंताने त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले. वडील मॅजिस्ट्रेट होते त्यांना ख्रिश्चन धर्मा विषयी किंवा एकंदरीत आध्यात्म विषयात गोडी होती. घरी भेटायला येणाऱ्या लोकांमध्ये जेंव्हा धर्म विषयक किंवा आध्यात्मविषयी चर्चा चाले त्यावेळी तरुण दाविद त्यात हिरहीरीने भाग घेऊन आपल्या बायबल आणि एकंदरीत आध्यात्म ज्ञानाची चुणूक सर्वाना दाखवून देई. तसेच श्री महाराज शालेय जीवनात बॉक्सिंग चॅंपियन सुद्धा होते. म्हणजेच बुद्धी प्रमाणे त्यांचे शारिरिक बळ सुद्धा उत्तमच होते.
त्या वयातही B.D.D चाळीमध्ये वावरताना किंवा मुंबई गोदीत काम करताना एकंदरीत वागणूक निरिच्छ किंवा जगा विषयी उदासीन अशीच असे. वयाच्या ३० वर्षानंतर ते हळूहळू जास्त अबोल आणि परमेश्वराभिमुख वृत्ती घेऊनच रहात. अशाच भावावस्थेत उपरती झाल्यामुळे एकदा कुणालाही काहीच न कळविता अंदाचे १९७०-७२ च्या दरम्यान ते मुंबई सोडून कुठे तरी अज्ञातवासात निघून गेले.
बहुदा ते हिमालय, उत्तर हिंदूस्तान फिरून आले असावेत. कारण बऱ्याच लोकांना बोलण्यात ते दाखले देत असत. घरातील आप्तस्वकियानी पुष्कळ शोध घेतला परंतु त्यांचा काहीच ठाव लागला नाही. यापुढचा महाराजांचा कार्यकाल हा माधवनगर या सांगलीजवळील ऊपनगरातच होता.
केसाच्या जटा, दाढी मिश्या वाढलेल्या, अंगावर कुणीतरी दिलेली सोलापूरी चादर. कधी कुणी जेवायला दिलं तर दिवाळी नाहीतर सदा एकादशी. एकंदरीत दणकट शरीरयष्टी, डोळ्यात अज्ञानी जिवांबदद्ल मुर्तीमंत कारुण्य.
जी व्यक्ती जो भाव घेऊन त्यांच्याजवळ जाई ,त्या भावाने ते त्या व्यक्तीचे १-२ वाक्यात उत्तर देऊन समाधान करीत . प्रापंचिक व्यक्तींनी व्याकुळ होऊन सेवा केली तर त्यांचे प्रश्न आपोआप चुटकी सरशी सुटणे, शारीरिक व्याधी त्यांच्या सेवे मुळे नष्ट होणे किंवा कमी होणे. राजकारणी व्यक्तींना १-२ शब्दांत केलेल्या उपदेशाने त्यांची प्रगती होणे. बऱ्याच भक्तांना स्वप्नात जाऊन मार्गदर्शन किंवा उपदेश करणे . अशा विविध घटनांनी त्यांचा कीर्ती सुगंध पंचक्रोशीत दरवळू लागला.
महाराजांचे बरेच भक्त मुंबई , पुणे , कोल्हापूर , नगर, कोकण इथूनही येऊ लागले . एकदा फुल पूर्ण उमलले कि भुंग्यांना आमंत्रणाची गरज नसते तद्वतच महाराजांचे शिष्यगण अनेक ठिकाणाहून येऊ लागले . इतके सर्व होऊनही या दिगंबर महात्म्याची " आकाश चादर आणि माती हीच गादी " ही वृत्ती तसुभरही ढळली नाही . येणाऱ्या भक्तांकडून बऱ्याचदा रु . ३०/- मागून घेत . त्याचे वेगवेगळे अर्थ प्रत्येक भक्त काढत असे . काहीजण म्हणत कि ३०/- रु . मागून महाराज जणू सांगत कि मी त्रिमूर्ती दत्त आहे . ख्रिश्चन धर्माप्रमाणे ट्रीनीटी , किंवा तू ३०% प्रयत्न कर उरलेले ७०% मी करतो . बायबल मधील कथेप्रमाणे येशुख्रिस्ताला शोधून क्रुसावर देण्यासाठी ३०/- रु . बक्षीस होते. त्याप्रमाणे तू ३०/- रु दे मी तुझ्या अंतरात्म्यापर्यंत पोचायला मदत करीन .
भक्तांनी दिलेले पैसे किंवा चादर असोत कधीच त्यांची फिकीर केली नाही. त्या सर्व वस्तू गरीब किंवा गरजू लोक पळवून नेत. तरीही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सर्व ऋतू एकसारखेच झेलले . अगदी एका अपघातात त्यांचा हात मोडला होता तरीही चेहऱ्यावर कुठल्याही वेदना न दर्शविता "सगळं सहन करायचं " हे वाक्य आपल्या एका भक्ताला ऐकवले होते .
लहान मुलं आली कि महाराजांना खूप आनंद होत असे आणि त्यांच्या हातात जे काही असे ते त्या लहान मुलांच्या ओंजळीत देत असत आणि त्यांचाकडे बघुन "पप्पा" असं कौतुकाने म्हणत. स्त्री भक्तांविषयी त्यांना खूप कौतुक असे. सर्व संसार मुलं बाळं घरकाम सांभाळून वेळात वेळ काढून त्यांच्यापर्यंत येणाऱ्या स्त्री भक्तांना त्यांनी नेहमीच आदराची प्रेमाची वागणूक दिली. आपल्या काही अनाकलनीय शारीरिक क्रियांद्वारे ते भक्तांना दाखून देत कि काम हि आध्यात्म मार्गातील मोठी धोंड आहे. त्याचावर विजय मिळव.
भक्तानां श्री. महाराज सांगत नेहमी अन्नदान करा ,अशाच संकल्पनेतून माधव नगरातील भक्त मंडळीनी २५-०७-२०१० पासुन दर पौर्णिमेला श्री. महाराजांच्या आशीर्वादाने महाप्रसाद सुरु केला त्याचीच री ओढत काही भक्त व्यक्तिगत पातळीवरही दर गुरुवारी अन्नदान करत असतात .
शेवटची काही वर्षे माधवनगरातील एक उद्योजक श्री शहा साहेब यांनी आपले दुकानच श्री महाराजांच्या वास्तव्याला आणि त्यांना भेटायला येणाऱ्या भक्तांसाठी देऊ केले. तसेच श्री महाराजांसाठी सकाळी म्हैशाळकर कुटूंब आणि रात्री श्री टेके साहेब यांनी बरीच वर्षे जेवणाची सेवा दिली. तसेच श्री प्रकाश किरवे यांचीही सेवा अमुल्य आहे. माननीय खासदार श्री संजय काका पाटील तसेच ,श्री नेताजी साळुंखे, अण्णा साहेब साळुंखे,विष्णू माने,गवळी, पोतदार, कांबळे मावशी,श्री भेंडवडे साहेब, श्री. भीमराव कोळी, श्री.बोडके ,श्री. जंगमसाहेब श्री. विठ्ठल संकपाळ,श्री आबा पाटील, श्री देशभूषण, पाटील कुटुंबीय, अप्पू शेठ (दुर्गाप्रसाद हॉटेल), श्री पवार (Driver), श्री. पठाण, श्री रावसाहेब बिद्री, श्री. नंदू, वैशाली ज्वेलरचे मालक श्री पाटील साहेब या भक्तांची सेवाही अवर्णनीय आहे. श्री महाराजांच्या समाधीसाठी श्री शिवाजी ( पप्पू) डोंगरे(जिल्हा प्रदेश सदस्य सांगली ) यानी स्वतःची जागा दिली आहे. तसेच समाधी स्थळाचे बांधकाम श्री डोंगरे यांच्या पुढाकाराने सुरु आहे. श्री महाराजांचा उपदेश हा कृतीतून किंवा अनाकलनीय बोलण्यातून असे. महाराजांपाशी असताना ते काय बोलतात याचा अर्थच बऱ्याच वेळा कळत नसे पण नंतर काही काळानंतर ते काय म्हणतायत याचा उलगडा आपोआप भक्तांना होत असे.
शेवटचे एकवर्ष महाराज पूर्ण वेळ सांगली सिविल हॉस्पीटल मधेच होते. परंतू कधीही हताश निराश नसत. या कालावधीत काही दिवस ते कोल्हापूरातील प्रसिध्द सर्जन डॉ. लाड यांच्या हॉस्पीटल मध्ये सुद्धा होते. डॉ. लाड आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब सुद्धा महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांच्या शिव्या याच अभंगातील ओव्या किंवा आशिर्वादाप्रमाणे काम करत. बऱ्याच वेळा त्यांनी मार दिल्या मुळे सुद्धा भक्तांच्या बऱ्याच समस्यांचे निवारण झाल्याचे दाखले स्वत: भक्तांनीच सांगीतले आहेत. आपल्या देहत्यागापूर्वि मात्र ते एकदा त्यांच्या घरी जवळपास ४० वर्षानंतर B.D.D. चाळ शिवडी येथे येऊन गेले.
देह त्यागाची पूर्व सूचना ते भक्तांना देताना म्हणत . आता मला माझ्या घरी जायचंय, आता खाट उलटी करायची वेळ झालीय. अशा या प्रत्यक्ष प्ररब्रम्हाने दाविद माऊली ने दि . १ जुलाई २०१३ रोजी स. ६.५५ मि . महासमाधी घेतली.
बऱ्याच भक्तांना ते म्हणंत 24 Hours I am with you ,२४ तास माझी नजर तुमच्यावर आहे. अर्थात मानंल तर. जैसा तेरा गाना वैसा मेरा बजाना - आजही असंख्य भक्तानां महाराजांचे स्वप्नात दर्शन, उपदेश होतच असतो. श्री. महाराजांची समाधी सांगली जवळील माधवनगर येथे आहे. जिज्ञासु , गरजूंनी प्रत्यक्ष समाधीवर जाऊन अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही. पुर्ण विश्वासाने जो माथा टेकेल त्या भक्ताचं काम नक्कीच होईल .